Chakan News : एमआयडीसीतील खड्ड्याची पूजा करून आंदोलन
Chakan News : चाकण एमआयडीसी हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर असून, दररोज हजारो कामगार, अवजड वाहने आणि अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, एमआयडीसीतील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

महाळुंगे इंगळे : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था, जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे आणि अपुर्या पायाभूत सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून एमआयडीसीतील एका मोठ्या खड्ड्याची प्रतीकात्मकरीत्या ‘देव’ म्हणून पूजा करण्यात आली. खड्ड्याला हळदी-कुंकू वाहून दुधाचा अभिषेक करण्यात आला. या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाने रस्त्यांच्या दुरवस्थेची गांभीर्याने दखल घ्यावी, असा संदेश देण्यात आला.
या आंदोलनात उद्योजकांसह तीर्थक्षेत्र देहू, भामचंद्र डोंगर आणि भंडारा डोंगर परिसरातील वारकरी संप्रदायातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वारकर्यांनी हरिनामाचा गजर करीत उपोषणाला पाठिंबा दिल्याने आंदोलनाला सामाजिक तसेच धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. चाकण एमआयडीसी हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर असून, दररोज हजारो कामगार, अवजड वाहने आणि अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, एमआयडीसीतील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघातांचा धोका वाढला आहे.
उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा, वीज, रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधांबाबतही उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असताना त्या तुलनेत पायाभूत सुविधा सक्षम करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सार्वजनिक मालमत्तेची होणारी हानी तसेच अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता रस्त्यांची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
उपोषणाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे पाटील म्हणाले, चाकण एमआयडीसी हे औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून अपघातांचाही धोका वाढला आहे. उद्योगांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. रस्तेच व्यवस्थित नसतील, तर उद्योगांचे कामकाज सुरळीत कसे चालणार? प्रशासनाने उद्योजक व नागरिकांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
चाकण एमआयडीसीतील रस्ते व पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.





