पुणे जिल्हा | शिरूर तालुक्यात एकाचा विहिरीत बुडून मृत्यू

सविंदणे, (वार्ताहर)- धुलिवंदनाचा सण साजरा केल्यानंतर विहिरीवर पोहायला गेलेल्या एका युवकाचा कठड्यावरुन तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. तर या घटनेचा धसका घेऊन त्याच्या एका घाबरलेल्या मित्राने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या दोन्ही घटनांबाबत शिरूर पोलिसांनी स्वतंत्रपणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
विहिरीत पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव विक्रम अशोक शिंदे (वय 18, रा. बाबूराव नगर, शिरुर) असे आहे. तर राहत्या खोलीतील सिलिंगच्या हुकाला दोरीने गळफास घेतलेल्या युवकाचे नाव विशाल नवनाथ शिंदे (वय 21, रा. बाबूरावनगर; मुळ रा. विसापूर, ता. श्रीगोंदा) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धूलिवंदन साजरी केल्यानंतर काही मुले पुणे-नगर रस्त्यालगत बोर्हाडेमळा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या विहिरीवर पोहायला गेली होती. विक्रम शिंदे याला पोहता येत नव्हते. विहिरीच्या काठावर उभा असताना तोल जाऊन तो विहिरीत पडला व पोहता येत नसल्याने बुडू लागला. त्याच्यासोबतच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला; परंतु वेळेत कुणाची मदत न मिळाल्याने ते घाबरुन घरी पळून गेले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विक्रम याच्या कुटुंबीयांनी बोर्हाडेमळा येथील विहिरीकडे धाव घेतली. विहिर तुडूंब पाण्याने भरलेली असल्यामुळे शोध लागत नव्हता. त्यामुळे मोटारी लावून विहिरीतील पाणी उपसल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विहिरीच्या पायरीखाली विक्रम मृतावस्थेत आढळून आला.
दुसरीकडे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास विशाल शिंदे याने राहत्या खोलीत गळफास घेतला. विशाल हा चिंतामणी लॅब चालवत होता व मित्रांसमवेत बाबूरावनगर येथे राहण्यास होता. त्याचे चुलते गणेश शिंदे यांनी पोलिसांना या घटनेबाबत कळविले. दोन्ही घटनांबाबत स्वतंत्र नोंदी घेतल्या असल्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी सांगितले.





