नगर | चारचाकींच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू

श्रीगोंद : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील चिंभळे चौकात दोन चारचाकी गाडीचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.संतोष हनुमंत लगड (वय ४८ रा. बेलवंडी बु.) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अपघाताची खबर देण्यात आली.
बेलवंडी येथील रहिवासी असलेले संतोष हनुमंत लगड हे त्यांच्या ओमनी (एम् एच १२ व्ही जे १२०५) गाडीतून चिंभळा चौकाकडे जात असताना समोरून येणाऱ्या आय २० (एम् एच १४ बी एच ०८४९) या गाडीच्या चालकाने ओमनीला जोराची धडक दिली. या धडकेत ओमनीचालक संतोष हनुमंत लगड हे गंभीर जखमी होऊन उपचार चालू असताना त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आय २० वाहनाचा वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला.
मारहाणीत मृत्यू की अपघातात मृत्यू ?
ओमनी आणि समोरून येणाऱ्या आय २० या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत आय २० चे नुकसान झाल्याने दोघांच्यात झटापटी होऊन त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. या हाणामारीत संतोष लगड यांच्या छातीला मार लागल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची चर्चा घटनास्थळी मोठ्या प्रमाणात होती. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होणार की अपघाताचा ? याचा निर्णय पोलीस घेणार आहेत.





