BIG UPDATE : देशातील ओमायक्रॉनच्या पहिल्या दोन बाधितांपैकी एक रुग्ण २७ नोव्हेंबरलाच दुबईला रवाना

बंगळुरू – भारतात करोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ या उत्परिवर्तित प्रकाराने प्रवेश केला आहे. कर्नाटक येथे या विषाणूची बाधा झालेले दोन रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जीनोम सिक्वेन्सिंग अहवालातून समोर आली आहे.
बंगळुरू विमानतळावर आल्यानंतर ६६ व ४६ वर्षीय पुरुषांची करोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. चाचणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांमधून ‘ओमायक्रॉन’ विषाणू असल्याचे स्पष्ट झाले.
अशातच आता बंगळुरू महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार ‘ओमायक्रॉन’ बाधितांपैकी ६६ वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असलेला पुरुष प्रवासी २७ नोव्हेंबरलाच दुबईला गेला असल्याचं समोर आलं आहे.
बंगळुरू महापालिकेने नेमकी काय माहिती दिली?
प्रवाशाचे वय – ६६ वर्ष
कोठून आला – दक्षिण आफ्रिकेतून (दुबई मार्गे)
१) दक्षिण आफ्रिकेहून २० नोव्हेंबरला आलेल्या प्रवाशाची बंगळुरू विमानतळावर तपासणी व करोना चाचणी करण्यात आली. प्रवाशाकडे दक्षिण आफ्रिकेतील कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट होता. तसेच त्याचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले होते.
२) बंगळुरू विमानतळावरून त्याने एका हॉटेलमध्ये चेकइन केले. दरम्यानच्या काळात प्रवाशाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
३) युपीएचसीच्या डॉक्टरांनी हॉटेलमध्ये जाऊन तपासणी केली. रुग्णाला कोणतीही लक्षणे नसल्याने त्याला सेल्फ आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला.
४) २२ नोव्हेंबरला रुग्णाचे टेस्ट सॅम्पल घेऊन जीनोम सिक्वेन्सिंगसाठी बीबीएमपीला पाठवण्यात आले.
५) त्या प्रवाशाने एका खासगी प्रयोगशाळेत करोना चाचणी करून घेतली. २३ नोव्हेंबरला केलेल्या या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला.
६) या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. सर्वजण निगेटिव्ह असल्याचे समोर आले.
७) २२ व २३ नोव्हेंबरला युपीएचसीने रुग्णाच्या दुय्यम संपर्कातील २४० जणांची चाचणी केली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.
८) २७ नोव्हेंबरला या व्यक्तीने हॉटेलमधून चेकआउट केले. येथून त्याने कॅब करत विमानतळावर गेला. तेथून तो दुबईला रवाना झाला.





