स्वारगेट प्रकरणाला एक महिना पूर्ण; अद्यापही DNA अहवाल प्रतिक्षेतच, मोबाईचाही पत्ता नाही: दोषारोप पत्रास विलंब

Swargate rape case | स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केली असून तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गाडेचा डीएनए अहवाल आणि त्याचा मोबाईल पोलिसांना मिळून आलेला नाही. पोलिसांकडून गाडेची कसून चौकशी केली जात आहे.
२५ फेब्रवारी रोजी स्वारगेट आगारात एका बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर गाडेने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून अद्यापर्यंत पोलिसांना डीएनए चाचणी अहवाल प्राप्त झालेला नाही. डीएनए चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांनी गाडेचे कपडे जप्त केले आहेत. त्याच्याविरुद्ध तांत्रिक आणि न्यायवैद्यकीय पुरावे गोळा केले जात आहेत. या प्रकरणातील पीडित तरुणीचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तसेच ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्या बसच्या चालक आणि वाहक यांचाही जबाब पोलिसांनी नोंदविला आहे.
गाडे मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा आहे. पसार झाल्यानंतर गाडे गुनाट गावातील ऊसाच्या फडात लपून बसला होता. तीन दिवसांनी गाडेला सापळा रचून आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली. गाडेविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत.
उद्यापर्यंत त्याचा मोबाईल देखील सापडलेला नाही. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शानाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे आणि पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.





