किराना मालाच्या दुकानातून एक लाखांचे अन्न-धान्य चोरीस

पिंपरी – पत्राशेडचे पत्रे उचकटून चोरट्यांनी एक लाख 13 हजार 992 रुपयांचे अन्न-धान्य चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना हिंजवडी जवळील माण येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली. संचारबंदीच्या काळातही चोऱ्या होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
श्रवणकुमार पुखराजजी गेहलोत (वय 43, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी मंगळवारी (दि. 14) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास फिर्यादी श्रवणकुमार यांनी आपले किराना मालाचे दुकान बंद केले.
बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाचे पत्रे उचकटून आतील 120 तांदळाचे कट्टे आणि गोडेतेलाचे बॉक्स असा एकूण एक लाख 13 हजार 992 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वायबसे याबाबत अधिक तपास करीत आहेत.





