मध्यप्रदेशमध्ये दोन महिन्यांत लाखभर करोनाबाधितांचा मृत्यू ?

भोपाळ -मध्यप्रदेशात दोन महिन्यांत लाखभर करोनाबाधित मृत्युमुखी पडल्याचा सनसनाटी दावा कॉंग्रेसने शुक्रवारी केला. मात्र, राज्य सरकारने तो फेटाळून लावला.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत राज्य सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप केला. आम्ही चालू वर्षीच्या मार्च आणि एप्रिलमध्ये राज्यात झालेल्या अंत्यविधींची आकडेवारी गोळा केली.
त्यानुसार, दोन महिन्यांत राज्यभरात 1 लाख 27 हजार 503 जणांवर अंत्यविधी झाले. त्यातील 1 लाखहून अधिक जण करोना संसर्गामुळे दगावल्याचे स्पष्ट झाले, असे नाथ यांनी म्हटले. मात्र, त्यांचा दावा मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी फेटाळला.
नाथ खोटा आणि दिशाभूल करणारा दावा करत आहेत. त्यांनी पुरावा द्यावा. पुरावा देण्यात अयशस्वी ठरल्यास नाथ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. त्यांचा दावा खरा ठरल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे आव्हानही मिश्रा यांनी दिले.





