बीडमध्ये ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू
Updated On:

बीड : बीड जिल्ह्यातील देवी निमगाव येथे एका कंटेनर ट्रकची आणि मोटारसायकची समोरासमोर धडक झाल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. संदीप विश्वनाथ अनारसे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अपघाताच्या काही वेळापूर्वी संदीप अनारसे यांनी कुटुंबियांना फोन करून सांगितले होते की, ते १० मिनिटांत घरी पोहोचणार आहेत.
पैठण-बारामती रस्त्यावर पावणे वस्ती परिसरात आष्टी येथील धामणगावहून येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये संदीप यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.





