बारामतीत ‘राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी एक तास’

राष्ट्रवादीचा उपक्रम : आता समस्या सुटणार
बारामती : बारामती शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नुकताच “राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी एक तास’ उपक्रम सुरु केला आहे. उपक्रमाअंतर्गत पदाधिकाऱ्यांची शहरातील उघडा मारुती मंदिर प्रभाग क्रमांक 12 मध्ये बैठक पार पडली. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, स्थानिक नगरसेवक राजेंद्र बनकर, कुंदन लालबिगे, अभिजीत काळे, संजय लालबिगे, राष्ट्रवादी शहर युवती अध्यक्षा आरती शेंडगे, राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, इम्तीयाज शिकीलकर, दीपक मलगुंडे, प्रताप पागळे, दिलीप ढवाण, साधू बल्लाळ उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. नगरपालिका पदाधिकारी आणि प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या.
पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी एक तास’उपक्रम शहरातील 20 प्रभागांत राबविला जाणार आहे. याअंतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात स्थानिक नागरिकांसमवेत प्रत्येक आठवड्याला बैठक घेतली जाणार आहे. नगरपालिकेसह विविध प्रशासनाशी संबंधित नागरी समस्यांचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. समस्या सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
उपक्रमाचा अहवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सादर करण्यात येणार आहे. गरज पडल्यास समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी अजित पवार यांची मदत घेतली जाणार आहे. नागरिकांचा थेट पक्षासमवेत संवाद होणार आहे. शहराची पाहणी पूर्ण होणार आहे. नागरिकांनी समस्या पुढे येऊन मांडाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.





