बनावट दस्तऐवज बनवून जमीन खरेदी केल्याप्रकरणी एकास अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे – सासवड येथील मालमत्ता मूळ मालकाच्या माहितीशिवाय जमिनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून विकण्याचा प्रयत्न केला होता. बोगस व्यक्तीस थांबवून खरेदी खत करणाऱ्यास अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. सत्र न्यायाधीश ए. एस गांधी यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, विवेक इंगळे व इतर व्यक्तींनी खानवडी तालुका पुरंदर येथील 1 हे. 20 आर इतका जमिनीचा व्यवहार मूळ मालकाच्या संमती विरुद्ध ठरवला. व तोतया व्यक्ती उभी करून खरेदी खत करून व कुलमुखत्यार पत्र बनवून जमीन बळकावून विकण्यात आली होती.
याप्रकरणी सासवड पोलिस स्टेशन येथे जमिनीच्या मूळ मालकांनी तक्रार दाखल केली होती या गुन्ह्यात एकूण सात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहितेचे कलम 318,338,336(3),340,61 अन्वये दाखल गुन्ह्यात विवेक इंगळे यांने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी ॲड. पवार व ॲड. प्रणित नामदे यामार्फत न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता.
याप्रकरणी न्यायालयात युक्तिवाद करतेवेळी प्रस्तुत गुन्ह्यात आरोपीचा कसलाही सहभाग दिसून येत नाही. त्याला ह्या गुन्ह्यात नाहक गोवण्यात आले असून तो या व्यवहारात कसलाही लाभार्थी नाही.
तसेच गुन्हा दाखल करण्यास दोन महिन्याच्या विलंब आहे. असा युक्तिवाद आरोपी तर्फे ॲड अजित पवार व ॲड प्रणित नामदे यांनी न्यायालयात केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस गाँधी यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.





