तळेगाव ढमढेरे येथील करोना बाधित इसमाचा मृत्यू

शिक्रापूर (प्रतिनिधी) – तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे एका 55 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील 55 वर्षीय इसम हडपसर येथे त्याच्या मुलीला भेटून आल्यानंतर काही लक्षणे जाणवू लागल्याने त्याची करोना तपासणी केली. 6 जुलै रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले. सदर इसमावर पुणे येथे उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, आज उपचार सुरु असताना पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, तळेगाव ढमढेरे येथे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. परंतु, मार्चमध्ये अचानकपणे एका इसमाला करोनाची बाधा होऊन त्याच्या घरातील काही व्यक्ती बाधित झाले. त्याच घरातील एका महिलेचा करोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे तळेगाव ढमढेरे येथील करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या दोन झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





