पुणे जिल्हा | कंटेनरखाली चिरडल्याने एकाचा मृत्यू

शिक्रापूर, (वार्ताहर) – सणसवाडी (ता. शिरूर) येथे भाजी घेण्यासाठी दुचाकीहून आपल्या मित्रासह मित्राच्या दोन मुलींना घेऊन आलेल्या एका दुचाकीला कंटेनरची धडक बसून कंटेनरखाली चिरडला गेल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघी मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
ही घटना रविवारी (दि. 8) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी कंटेनर चालकावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.
शारदानंद ब्रिजकिशोर तिवारी (वय 45 रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर मूळ रा. आझादनगर ता. भुली जि. धनबाद झारखंड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.
तर रंजन राजवंश पाठक (वय 33 रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मूळ रा. आझादनगर ता. भुली जि. धनबाद झारखंड) यांनी फिर्याद दिली आहे. सणसवाडी येथील पुणे-नगर महामार्गालगत शारदानंद तिवारी हे दुचाकी (एमएच 12 एसझेड 2812)वरून त्यांचे मित्र भोला शर्मा यांच्या दोन लहान मुलींसह गेलेले असताना,
सणसवाडी येथे भोला शर्मा भाजी घेण्यासाठी दुचाकीहून खाली उतरले होते तर शारदानंद तिवारी हे दोन मुलींसह दुचाकीवर बसलेले असताना पाठीमागून कंटेनर (एमएच 46 बीयु 7226) भरधाव वेगाने येऊन तिवारी यांच्या दुचाकीवर आदळला गेला यावेळी दुचाकीसह तिवारी व दोन मुली कंटेनरखाली चिरडल्या गेल्या.
या अपघातात शारदानंद यांचा जागीच मृत्यू झाला असून भोला शर्मा यांच्या दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अतुल पखाले हे करत आहे.





