पिंपरी | झाड पडल्याने दीड तास वाहतूक कोंडी

जाधववाडी, (वार्ताहर) – संततधार पाऊस सुरु असल्याने कुदळवाडी येथील मोरे पाटील चौक अंतर्गत रस्त्यात बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बाभाळीचे मोठे झाड पडले. परिणामी दीड तास वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन जवानांना झाड काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
याबाबत दिनेश यादव यांना माहिती मिळताच चिखली अग्निशमन विभागाला याबाबत सूचना देत तातडीने झाड हटविण्यास सुरवात झाली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
कुदळवाडी येथे कस्तुरी प्लोरा येथे हे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काल देखील या रस्त्यावर पाऊसामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. आज पुन्हा जवळपास तासभर होत आला तरी हे झाड हटवले गेले नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अन्गिशमन दलाचे सुनील फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सिनियर फायर मन अंकुश बढे वाहन चालक अमोल खंदारे, ट्रेनी फायर मन, जगदीश पाटील, विनायक बोद्रे, प्रथमेश नवले, यांनी झाड हटविल्यानंतर सुमारे दीड तासानंतर वाहतूक पूर्ववत झाली.





