Rohini Khadse On Chitra Wagh : कधी काळी बाप म्हणायच्या, आज त्यांनाच वयावरून बोललं जातंय; रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

Rohini Khadse On Chitra Wagh : हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये कितपत सत्य आहे ते मला माहिती नाही, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय, असं वक्तव्य पहलगाममधील हल्ल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. यावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
चित्रा वाघ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं की, काल काय ऐकले ते पवार साहेबांना आज आठवत नाही. काल गणबोटे ताईंनी आपबिती सांगितली आणि पवार साहेब म्हणतात, धर्म विचारुन मारले, याबाबत मी ऐकले नाही, असे म्हणत चित्र वाघ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
त्यावर आता रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमदार झाल्या पण काम ट्रोल आर्मीचं करत आहेत. पहिल्याच वाक्यात अप्रत्यक्षपणे पवार साहेबांच्या वयावर बोलले जात आहे. कधी काळी पवार साहेबांना या बाप म्हणायच्या आज त्यांनाच वयावरून बोलले जात आहे. भाजपात हे नव्याने शिकवले जात आहे बहुतेक. गरज सरो आणि वैद्य मरो या वृत्तीचं काटेकोरपणे पालन झालंय, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले होते शरद पवार?
काश्मीरमध्ये जे घडलं त्याकडे संपूर्ण देशवासीयांनी एकजुटीने आणि सरकारसोबत उभं राहून पाहिलं पाहिजे. पर्यटकांना हिंदू असल्यामुळे गोळ्या घातल्या यामध्ये नेमकं काय सत्य आहे? हे मला माहीत नाही. पण घटनास्थळी जे लोक उपस्थित होते, त्यामधील महिलांना सोडण्यात आलं असल्याचं दिसतं आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्हाला (महिलांना) हातही लावला नाही. त्यांनी केवळ आमच्या पुरुषांवर हल्ला केला, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
आमदार झाल्या पण काम ट्रोल आर्मीचं करत आहेत !
पहिल्याच वाक्यात अप्रत्यक्षपणे पवार साहेबांच्या वयावर बोलले जात आहे. कधी काळी पवार साहेबांना या बाप म्हणायच्या आज त्यांनाच वयावरून बोलले जात आहे.
भाजपात हे नव्याने शिकवले जात आहे बहुतेक. गरज सरो आणि वैद्य मरो या वृत्तीचं काटेकोरपणे… https://t.co/ZJdSi1kkNV
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 25, 2025





