“तुझ्या वाटेकडे…” कुशल बद्रिकेने अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी लिहिली खास पोस्ट

मुंबई – झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिके घरा घरात पोहचला आहे. सिनेमा असो टीव्ही कुशल आपल्या निखळ मनोरंजनासाठी ओळखला जातो. कुशल सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल अथवा विविध विषयांबाबत तो नेहमीच माहिती देत असतो. नुकतेच कुशलने त्याच्या पत्नीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली. .
कुशलने सोशल मीडियावर पत्नी सुनयना बद्रिकेसोबतचे काही फोटो शेअर केले. ‘यार सुनयना, तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आझम” मध्ये डान्स बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार, झ्याक-प्याक राहणार.. जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा” खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस. बाकी तू परत येशील तेंव्हा…हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल.’
‘गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे आपलं घर” डोळे लाऊन बसेल आणि मी………मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून) तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार आणि मुघलांनी अमेरिकेवर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आझम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा,” असे त्याने या फोटोला भलेमोठे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
कुशलची बायको सुनैना एक नृत्यांगना आहे. तिचं ‘मुघल ए आजम’ हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. याच कार्यक्रमाचा प्रयोग करण्यासाठी ती अमेरिकेला निघाली आहे. यासाठी कुशलने बायकोचं अभिनंदनही केले आहे. दरम्यान, ‘रावरंभा’ या आगामी चित्रपटात कुशल ‘कुरबतखान’ नावाचे पात्र साकारणार आहे. याआधी तो ‘पांडू’या चित्रपटात दिसला होता.





