बैठकीला जाताना उदय सामंत, संभाजीराजे यांच्या बोटीला अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

रायगड – राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या बोटीचा मांडवा जेट्टीजवळ अपघात झाला आहे. जेट्टीजवळ बोट पार्क करताना चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी सामंत गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते.
यावेळी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या समवेत होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. यानंतर बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली.
यानंतर पालकमंत्री सामंत हे मांडवा येथे सुखरूप उतरून रस्ते मार्गाने अलिबागकडे रवाना झाले. मात्र पालकमंत्र्यांच्या स्पीड बोटला झालेल्या या अपघातामुळे, स्पीड बोटमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.





