३५०व्या शिवराज्याभिषेक दिनी सुवर्णहोनांनी शिवछत्रपतींना अभिषेक – संभाजीराजे छत्रपती

पुणे – रायगडावर यावर्षी ३५० वा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक असून, जगभर साजरा व्हावा यासाठी जल्लोषात अन् मोठ्या थाटात होणार आहे. यंदा ६ जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय भव्यदिव्य साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा…स्वराज्याच्या इतिहासाचा’, सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहे, तसेच ३५० सोन्याच्या होनने शिवराज्याभिषेक होईल, अशी माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोन्याचे होन तयार करण्याचा मान चंदुकाका सराफ ॲन्ड सराफ प्रा. लि. सुवर्णपेढीला देण्यात आला आहे. त्यांच्याकडून ३५० होन तयार केले असून, त्याचे अनावरण या वेळी संभाजीराजे छत्रपती आणि चंदुकाका सराफचे संचालक सिध्दार्थ शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना सिध्दार्थ शहा म्हणाले कि, या सोहळ्याचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती महाराज यांचे मी विशेष आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला हे सुवर्ण होन बनविण्याची संधी दिली.
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचे स्मरण आणि त्यांचा शौर्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी चंदुकाका सराफ यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. यातीलच एक भाग म्हणून शिवराज्याभिषेकासाठी वापरण्यात आलेले प्रत्येकी एक होन चंदुकाका सराफ यांच्या सर्व शोरूम्स्मध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. शिवछत्रपतींच्या काळातील स्वराज्यातले हे पहिले चलन महाराष्ट्रातील युवांनाही प्रेरणा देणारे ठरणारे आहे. याच हेतूने या होनाच्या प्रतिकृती शिवप्रेमींसाठी चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि. यांच्या सर्व शोरूममध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याचे प्री बुकींग ऑनलाईन किंवा जवळच्या शोरूममध्ये जाऊन करता येणार आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले,‘‘दुर्गराज रायगडावर शिवरायांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. हा सोहळा ऐतिहासिक असून, जगभर साजरा व्हावा यासाठी यंदाचा ३५० वा राज्याभिषेक जल्लोषात आणि मोठ्या थाटात होणार आहे. गडावर ५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत नाणे दरवाजा येथून गड चढण्यास प्रारंभ होईल. त्यानंतर नगारखाना येथे गडपूजन व २१ गावातील सरपंच व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या हस्ते होईल. ६ जून रोजी सकाळी ७ वाजता नगारखाना येथे रणवाद्यांच्या जयघोषात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन,ध्वजारोहन होईल. त्यानंतर शाहिरी कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी शिवछत्रपती महाराजांचा सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल. शिवरायांच्या समाधीस अभिवादन करण्यात येईल.
गडावर महाराष्ट्रातील युध्दकला आखाड्यांचा सहभाग असेल. पारंपरिक युध्दकला कशी असते, त्याचे दर्शन येथे होणार आहे. पट्टा, तलवार, भाला, वीटा, जंबिया, कट्यार, माडू, फरी गलका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. पालखी मिरवणूकीत बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होतील. – युवराज संभाजी छत्रपती महाराज





