5 जूनला मी तिहारच्या कारागृहातून बाहेर येईन; अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

नवी दिल्ली – इंडिया आघाडी ४ जुनला सत्तेवर आल्यास आपण ५ जूनला तिहारच्या कारागृहातून बाहेर येऊ, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. सध्या केजरीवाल हे १ जून पर्यंत अंतरीम जामीनावर बाहेर आहेत, पण त्यांना २ जूनपर्यंत पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे. आज ते आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते.
नगरसेवकांना संबोधित करताना केजरीवाल यांनी आरोप केला की तिहारमध्ये न्यायालयीन कोठडीत असताना आपले खच्चीकरण करण्याचा आणि अपमान करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. ते म्हणाले की, तिहारमध्ये माझ्या सेलमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे होते आणि १३ अधिकाऱ्यांनी त्याच्या फीडवर नजर ठेवली होती. सीसीटीव्ही फीड पीएमओलाही पुरवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मोदीजी माझ्यावर नजर ठेवून होते. मोदींना माझ्याबद्दल कोणता द्वेष आहे हे मला माहीत नाही.
केजरीवाल म्हणाले की, ‘आप’ नेते लोकांचा आदर आणि प्रेम करतात आणि आमच्या कामामुळे भाजपला भीती वाटते. मला २ जूनला तुरुंगात परत जावे लागेल. मी ४ जूनला तुरुंगातच निवडणुकीचे निकाल पाहीन. जर इंडिया ब्लॉक सत्तेवर आली तर मी ५ जूनला परत येईन,असे त्यांनी या वेळी नमूद केले.




