वाढदिवसाच्या दिवशी संभाजीराजेंची मोठी घोषणा म्हणाले,”आता चळवळीत काम करून..”

नाशिक – संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या जन्म दिवसानिमित्त मोठी राजकीय घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षी संभाजीराजेंचा वाढदिवस नाशिकमध्ये पार पडला. आता चळवळीत काम करून थकलो आहे. त्यामुळे आता बस्स झालं म्हणत स्वराज्य संघटना शंभर टक्के राजकारणात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच स्वराज्य संघटना 2024 ची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देखील यावेळी त्यांनी दिले.
काही महिन्यांपूर्वी संभाजी राजेंनी राज्यसभेसाठी सर्व पक्षियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांच्या या आवाहनाचा तितका फायदा त्यांना झाला नव्हता. तेव्हापासून संभाजी राजे आगामी राजकारणाबाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
संभाजीराजेंनी राजकीय महत्वकांक्षा स्पष्ट करत राज्यभर दौरा देखील केला. यानंतर ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘घर तिथे स्वराज्य’ अशी संकल्पना राबवली. याच प्रतिसादामुळॆ स्वराज्य संघटना राजकीय पक्षात यावी अशी मागणी होत होती. त्याच अनुषंगाने आता चळवळीचं काम खूप झालं,जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत यावंच लागेल असं म्हणत स्वराज्य संघटना 101 टक्के राजकारणात येणार असल्याचे म्हंटले आहे.
नाशिकच्या गंगापूर येथील गीता लॉन्स येथे संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी यावेळी भावी मुख्यमंत्री संभाजीराजे अशा घोषणा देखील दिल्या. राजकारणात येणार असल्याचे राजेंनी स्पष्ट केले असले तरी भविष्यात ते कोणत्या पक्षासोबत युती करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.





