Suresh Dhas : मुख्यमंत्री बीडच्या दौऱ्यावर, स्वागताच्या बॅनरवरून मुंडे बहीण-भावांचा फोटो वगळला; दोन्ही मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य

बीड : बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यामुळे सध्या बीड जिल्ह्याची राज्यभर चर्चा होत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे महायुतीमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या दोघांविरुद्ध आरोपांची सरबत्ती उडवली आहे.
त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते बीड दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच जानेवारी रोजी येणार आहेत, असं बोलले जात आहे.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या कामाच्या शुभारंभासाठी येणार आहेत. खुंटेफळ धरणाच्या बोगद्याच्या प्रकल्पाच्या कामाच्या शुभारंभासाठी ते येणार असून सन 2005-06 पासून ही योजना माझ्या डोक्यात होती. या प्रकल्पामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास 27 हजार 500 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्यात जोरदार स्वागत करणार असून 65 हजार लोक या कार्यक्रमाला येणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मंत्री आणण्याची आमची क्षमता नाही : सुरेश धस
बीड जिल्ह्यातील मंत्री आणण्याची आमची क्षमता नाही, मात्र, जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांची नावे पत्रिकेवर आहेत. या कार्यक्रमानंतर मच्छिंद्रनाथाच्या समाधीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी 10 कोटी रुपयांच्या गाभाऱ्याचा शुभारंभ करणार आहेत, असंही सुरेश धस यावेळी म्हणाले.
बॅनरवरून मुंडे बहीण भावांचा फोटो वगळला
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याआधीच धस आणि मुंडे बहीण भावांमधील संघर्ष समोर आला आहे. आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून मुंडे बहीण भावांचा फोटो वगळण्यात आला आहे. बीड प्रकरणानंतर मुख्यमंत्री फडणवीस बीड दौऱ्यावर असताना आता या कार्यक्रमात मुंडे बहीण-भावाची उपस्थिती असणार की नाही? हे देखील पाहणं महत्वाचे ठरणार आहे.





