Uddhav Thackeray : ओमराजेचं बंड जिव्हारी; उद्धव ठाकरेंनी सांगितला तो भावनिक प्रसंग म्हणाले ” गद्दारीचा शिक्का…”
Uddhav Thackeray : त्यांच्या भाषणात मुख्य रोख धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर असल्याचे पाहायला मिळाले.

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणात मुख्य रोख धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर असल्याचे पाहायला मिळाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा एक भावनिक प्रसंग उद्धव ठाकरे यांनी सांगितला. ते म्हणाले, धाराशिवमधील सभेनंतर एक गरीब शेतकरी त्यांच्याकडे आला होता. त्या शेतकऱ्याने आपल्या कष्टाची कमाई असलेली मदत उमेदवारासाठी दिली होती. “त्या एका रुपयामागचं प्रेम आणि विश्वास यामुळेच आपण निवडणूक जिंकू शकलो. समोर कोट्यवधी रुपयांचा महापूर होता, पण सामान्य कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आपले उमेदवार विजयी झाले,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांचा उल्लेख करत “400 वर्षांनंतरही त्यांच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसला गेला नाही. मग आज गद्दारी करणाऱ्यांना तो शिक्का पुसायला किती वर्षे लागतील?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
नेमकं काय घडलं होतं? (Uddhav Thackeray)
“कैलास पाटील साक्षीदार आहेत. लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातील प्रचारादरम्यान माझ्या सभेनंतर एक शेतकरी आला. कळकट मळकट कपड्यातील तो शेतकरी होता. शेतकरी-कष्टकरी म्हटल्यावर कशी कपडे असणार…तर त्या गरीब शेतकऱ्याने खिशातून एक बटवा काढला आणि तो शेतकरी म्हणाला की तुमच्या हस्ते ही मदत आपल्या उमेदवाराला मला द्यायची आहे. त्या बटव्यात किती पैसे असतील? एका सामान्य शेतकऱ्याची कमाई किती असते? पण त्या प्रेमाच्या एका रुपयाने ती निवडणूक आपण जिंकलो होतो.”
साध्या-साध्या माणसांनी त्यांच्या कष्टाचा पैसा देऊन…. (Uddhav Thackeray)
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, समोरून पैशाचा महापूर होता. धबधबा कोसळत होता. 50 कोटी काय, 100 कोटी काय. असा हरामाचा पैसा ओतला जात होता. कारण शिवसेनेला हरवायचं होतं. मात्र तरीही शेतकऱ्यांसारख्या साध्या-साध्या माणसांनी त्यांच्या कष्टाचा पैसा देऊन आपले खासदार जिंकून आणले होते, अशी भावनिक आठवण उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितली.
तुम्हाला किती वर्षे लागतील कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला?
बंडखोर खासदारांचा समाचार घेत, कुठे फेडाल ही पापं? कुठे फेडाल? तेच उमेदवार सभेत बोलले होते की खंडोजी खोपडे नाव घेतले की तुम्ही काय म्हणता? सूर्याजी पिसाळ नाव घेतलं की तुम्ही काय म्हणता? या लोकांना 400 वर्षे झाली तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसता आला नाही. तुम्हाला किती वर्षे लागतील कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला? भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात शिवसैनिकांना एकजुटीने लढण्याचे आवाहन करत पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याचा संदेश दिला.
हेही वाचा : Operation Tiger : अखेर फोटो आला समोर! ठाकरे गटातील फुटीर खासदारांसोबत दिसणारी ‘ती’ व्यक्ती कोण?






