Omprakash Rajenimbalkar : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा; खा. ओम राजेनिंबाळकरांनी केली मागणी

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीसह जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी संबंधित भागांचा दौरा केला आहे. असे असताना धाराशिवचे खासदार असलेल्या ओम राजेनिंबाळकर यांनी सरकारने ओला दुष्काळ असल्याचे जाहीर करताना, जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना, खा. राजेनिंबाळकर यांनी त्यांची भेट घेताना, त्यांनी ९ मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये ओला दुष्काळासह, प्रति हेक्टर ५० हजार मदत व बाधित शेतकऱ्यांची कर्जमाफी या तीन प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. यावर्षी भारतात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावासाने थैमान घातले होते. पंजाबमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर पंजाब सरकारने देखील शेतकऱ्यांना भरीव मदत केली होती, तशाच प्रकारच्या मदतीची मागणी खा. राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, पंजाबप्रमाणेच राज्य सरकारने देखील तातडीने मदत जाहीर करावी. पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जनावरे गमावली आहेत, त्यांना सध्याच्या बाजारभावानुसार मदतीची रक्कम अदा करावी. तसेच पुरग्र्स्त भागांना पुन्हा जोडण्यासाठी, त्याभागातील रस्ते, पूल व वीज या पायाभूत सुविधांसाठी शासनाने विशेष कार्यक्रम हाती घ्यावा, असे देखील ते बोलताना म्हणाले.





