धाराशिव : विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे, जनता ही मस्ती उतरवण्याचे काम करेल. भाजपला आता राष्ट्र प्रथम या विचाराचा विसर पडला आहे. आमच्या सोबत आले तरच निधी हा लोकशाहीचा खून असून अशा वृत्तीला ठेचायला हवे, असा हल्लाबोल ठाकरेसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नितेश राणेंवर केला आहे. धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर समितीच्या कामांवर स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील भाजपच्या मेळाव्यात लक्षात ठेवा, सगळ्यांचा बाप म्हणून मुख्यमंत्रिपदावर भाजपचाच नेता बसलेला आहे, असे विधान केले. यावर ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निंबाळकर म्हणाले, जनता ही सगळ्यांचा बाप असते त्याचा विसर पडू नये, जनता तुम्हाला धडा शिकवील. नितेश राणेंना धाराशिवमध्ये घर बांधून द्या. त्यांना जाण्या-येण्याचा त्रास नको, जनतेचे प्रश्न त्यांना किरकिर वाटत असेल तर ते आम्ही करणारच आहोत, अशी टीका त्यांनी राणेंवर केली आहे. नीलेश राणेंनी व्यक्त केली नाराजी नीलेश राणे यांनी नितेश राणे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, नितेशने बोलताना जपून बोलायला हवे. मी त्याला भेटल्यावर याबद्दल नक्कीच बोलेन. मात्र सार्वजनिकरित्या बोलताना प्रत्येक गोष्टीचे भान ठेवायला हवे. सभेत बोलणे सोपे असते, पण आपल्या बोलण्यामुळे नेमका कोणाचा फायदा होत आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण महायुतीचा भाग आहोत, हे विसरून चालणार नाही.