Olympics 2036 : भारताकडून 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी प्रस्ताव, ‘या’ अहवालात झाला मोठा खुलासा…

India Olympics 2036 :- ऑलिम्पिक 2024 पॅरिसमध्ये खेळले गेले. यानंतर पुढील ऑलिम्पिक म्हणजे 2028 मध्ये लॉस एंजेलिस, युनायटेड स्टेट्स येथे खेळले जाईल. यानंतर 2032 च्या यजमानपदासाठी देश आणि शहराचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण 2036 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार हे अद्याप ठरलेले नाही. आता, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताने 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी दावेदारी दाखल केली आहे.
दरम्यान, भारतात ऑलिम्पिक 2036 होणार असल्याची बातमी पहिल्यांदाच समोर आली नाही. याआधीही यासंदर्भात काही अहवाल समोर आले आहेत, ज्यामध्ये 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारत पुढे येऊ शकतो, असे म्हटले होते. तर 2036 पूर्वी, 2032 ऑलिंपिक खेळ ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार आहेत. वृत्तसंस्था IANS ने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, भारताने ऑलिम्पिक 2036 साठी दावेदारी (बोली) सादर केली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 1 ऑक्टोबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) कडे औपचारिकपणे एक पत्र सादर केल्यामुळे ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची भारताची शक्यता वाढली आहे.
वास्तविक, सन 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक खेळांचे यजमानपद मिळावे यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे (आयओसी) प्रस्ताव सादर करताना भविष्यात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी दावेदारी दाखल केली आहे.
क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 1 ऑक्टोबर रोजीच हे पत्र आयओसीकडे साद्दर केले आहे. सन 2036 चे यजमानपद भूषविण्याची इच्छा भारताने यापूर्वी देखील व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मनोगतामध्ये ही इच्छा बोलून दाखविली होती.
पुढील वर्षी आयओसीची निवडणूक होणार आहे. तोपर्यंत यजमानपदाचा निर्णय घेतला जाणार नाही. सध्याच्या घडीला यजमानपदाच्या शर्यतीमध्ये सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कस्थान हे देश असल्याने भारताला या देशांच्या कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांचासह भारताचे क्रीडा प्रशासक देखील यावर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. भारताला यजमानपद मिळाल्यास योगा, खो-खो, कबड्डी यांसारख्या देशी खेळांचा आग्रह धरणार असल्याचे देखील सूत्रांनी बोलताना सांगितले.

