Ollie Robinson Record : ऑली रॉबिन्सनने रचला इतिहास! कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहनंतर ‘हा’ खास पराक्रम करणारा दुसराच गोलंदाज
Ollie Robinson Record : ऑली रॉबिन्सनने तिसऱ्याच षटकात पाकिस्तानी सलामीवीर सैम अयुबला शून्यावर पायचित केले. या विकेट्स त्याने गेल्या १०० वर्षांतील एका अभूतपूर्व विक्रमाला गवसणी घातली आहे.

Ollie Robinson 100 Test Wickets Record Sub 20 Bowling Average Jasprit Bumrah : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडचा ३२ वर्षीय वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने (Ollie Robinson) आपल्या कारकिर्दीतील १०० वा बळी घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना रॉबिन्सनने तिसऱ्याच षटकात पाकिस्तानी सलामीवीर सैम अयुबला शून्यावर पायचित केले. या विकेट्स त्याने गेल्या १०० वर्षांतील एका अभूतपूर्व विक्रमाला गवसणी घातली असून, २० पेक्षा कमी गोलंदाजीच्या सरासरीने १०० कसोटी विकेट्स घेणारा तो जगातील केवळ दुसराच गोलंदाज ठरला आहे.
गेल्या १०० वर्षांत केवळ बुमराह आणि रॉबिन्सन; १९.३४ ची अविश्वसनीय सरासरी!
कसोटी क्रिकेटच्या गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात २० पेक्षा कमी सरासरीने १०० हून अधिक विकेट्स घेणारा रॉबिन्सन हा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनंतरचा पहिलाच गोलंदाज बनला आहे. रॉबिन्सनची सध्याची गोलंदाजीची सरासरी १९.३४ आहे, तर जसप्रीत बुमराहने ५२ कसोटी सामन्यांत १९.७९ च्या सरासरीने २३२ हून अधिक विकेट्स टिपले आहेत. या दोघांनंतर जॉनी वॉर्डल (२०.३९), अॅलन डेव्हिडसन (२०.५३) आणि माल्कम मार्शल (२०.९४) यांचा क्रमांक लागतो.
दोघांनीही २४ व्या कसोटीत गाठला टप्पा; जॉर्ज लोहमन यांचा शतकापूर्वीचा विक्रम अबाधित –
100th Test Match wicket for Ollie Robinson! 👏 pic.twitter.com/5086Dqe038
— England Cricket (@englandcricket) September 9, 2026
जून २०२१ मध्ये पदार्पण करणाऱ्या रॉबिन्सनने आपल्या कारकिर्दीतील २४ व्या कसोटीत हा पराक्रम गाठला. योगायोगाने भारताच्या जसप्रीत बुमराहनेही सप्टेंबर २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या २४ व्या कसोटीतच १०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. कसोटी इतिहासातील सार्वकालिक सर्वोत्तम सरासरीचा विचार केल्यास इंग्लंडच्या जॉर्ज लोहमन यांच्या नावावर १०.७५ च्या सरासरीने ११२ विकेट्सचा विक्रम आहे. लोहमन यांनी अवघ्या १६ सामन्यांत १०० विकेट्स घेण्याचा जागतिक विक्रम १८८६ ते १८९६ दरम्यान प्रस्थापित केला होता.
पाकिस्तानविरुद्ध रॉबिन्सनचा महासंहार; सलग दोन सामन्यांत ८-८ विकेट्स –
Ollie Robinson has the best Test bowling average among mordern day bowlers.
Even better than Bumrah🤯 pic.twitter.com/z8VXL3j9BF
— Dinda Academy (@academy_dinda) September 9, 2026
या संपूर्ण कसोटी मालिकेत रॉबिन्सनने पाकिस्तानी फलंदाजांची पळता भुई थोडी केली आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत त्याने प्रत्येकी ८-८ विकेट्स घेत दोन्ही वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला होता. तिसऱ्या कसोटीतही त्याने सुरुवातीलाच धक्का दिल्यामुळे पहिल्या सत्रातच पाकिस्तानची अवस्था ७ बाद १०० अशी दयनीय झाली. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि घातक माऱ्यामुळे जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये रॉबिन्सनच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.





