Nagar | विश्वास जुना, संग्रामभैय्या पुन्हा!

अहिल्यानगर, – नगर शहर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी सलग तिसऱ्यांचा विजय मिळवत हॅटटि्रक केली. आ. जगताप यांनी महाविकास आघाडीचे राशपचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचा ३९ हजार ६५० मतांनी पराभव केला. इतर बारा उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले. जगताप यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्यानंतर शहरासह उपनगरात गुलाल उधळून, फटाके फोडत, डीजेच्या दणदणाटात चौकाचौकात जल्लोष साजरा करण्यात आला. जगतापांच्या हॅटटि्रकने महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून दिवाळी साजरी करण्यात आली.
नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून राष्ट्रवादीचे उमेदवारी संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही जागा सोडण्यात आल्यानंतर माजी महापौर अभिषेक कळमकर यांना तिकीट देण्यात आले. त्यातच उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी अर्ज कायम ठेवल्याने चुरस वाढली होती. मात्र, नंतर खा.नीलेश लंके यांनी समजूत घातल्यानंतर गाडे यांना कळमकर यांना पाठिंबा दिला होता. जगताप यांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत मते मागितली होती. त्यांना भाजप व शिंदे गटाची साथ मिळाल्याने आ.जगताप यांनी प्रचारात पहिल्या दिवसापासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनीही शहर विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत नगर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन दिले होते. आ.जगताप व कळमकर यांच्यात दुरंगी लढत होऊन मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात नगर शहरात सर्वात कमी ५८.२८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकालाची उत्सुकता लागली होती.
शनिवारी सकाळी ८ वाजता एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी सुधीर पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले होते. टपाली मतदानात आ.संग्राम जगताप यांना ९५० तर अभिषेक कळमकर यांना ८०० मते मिळाली. जगताप यांना टपाली मतदानात दीडशेचे मताधिक्य मिळाले. इव्हीएमची मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत संग्राम जगताप यांना २५७२ मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य वाढत जाऊन सहाव्या फेरीपर्यंत आ. संग्राम जगताप यांना २०२३९ इतक्या मतांची आघाडी मिळाली. सातव्या, आठव्या व नवव्या फेरीत अभिषेक कळमकर यांना ७२४६ इतके मताधिक्य मिळाले. त्यामुळे जगताप यांचे लीड कमी झाले.
दहाव्या फेरीपासून पुन्हा वाढ होत १३ व्या फेरीपर्यंत जगताप यांना मताधिक्य मिळत ते थेट २३,७१२ पर्यंत गेले. चौदाव्या फेरीत कळमकर यांना ६८४ इतके मताधिक्य मिळाले. त्यानंतर १५ व्या फेरीपासून आ.जगताप यांच्या मताधिक्यात वाढ होत थेट २२ व्या फेरीपर्यंत कायम राहिले. जगताप यांनी ३९,४५२ इतके मताधिक्याने कळमकर यांच्यावर विजय मिळविला. आ.संग्राम जगताप यांना एकूण १,१७,३३२ इतकी मते मिळाली, तर अभिषेक कळमकर यांना ७७८८० इतकी मते मिळाली. तर बारा अपक्षांचे डिपाॅझिट जप्त झाले. नोटाला १५७२ इतकी मते मिळाली. एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, आनंद कोकरे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
सावेडी, केडगाव, सारसनगरची भरभक्कम साथ
संग्राम जगताप यांना सावेडी, पाइपलाइन रोड, नालेगाव, सारसनगर, बुरुडगाव व केडगावने भरभक्कम साथ दिली. या भागातून जगताप यांना मोठे मताधिक्य मिळाले. अभिषेक कळमकर सावेडी भागात राहत असताना सुद्धा याठिकाणाहून जगताप यांना मताधिक्य मिळत गेले, ते शेवटपर्यंत कायम राहिले. याशिवाय कोतकरांचा बालेकिल्ला असलेल्या केडगावातून जगताप यांना सलग तिसऱ्यांदा मताधिक्य मिळाले. केडगावात कोतकरांनी तुतारीला साथ देण्याचा निर्णय घेतला मात्र, केडगावातून घड्याळाला मताधिक्य मिळाल्याने कोतकरांना बालेकिल्ल्यात धक्का बसला.
उमेदवारांना मिळालेली मते, व पक्ष पुढीलप्रमाणे
अभिषेक कळमकर, राशप ७७,८८०
उमाशंकर यादव, बसप, २७६
सचिन डफळ, मनसे ११२१
संग्राम जगताप, राष्ट्रवादी काॅंग्रेस १,१७,३३२
शिवाजीराव डमाळे, एसएपी, ३३४
हनीफ शेख, वंचित बहुजन आघाडी ५८५
उत्कर्ष गिते, अपक्ष, ४६१
गणेश कळमकर, अपक्ष १९७
किरण काळे, अपक्ष, ४९
शशिकांत गाडे, अपक्ष, १०१,
प्रतीक बारसे, अपक्ष ९२७
मंगल भुजबळ, अपक्ष ३६१
सचिन राठोड, अपक्ष ११२
सुनील फुलसौंदर, अपक्ष २५५
नोटा १५७२





