ओला कर्मचाऱ्याची आत्महत्या प्रकरण: CEO भाविश अग्रवाल यांच्यासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!

बंगळूरु: ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या कथित आत्महत्या प्रकरणात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भाविश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकारी सुब्रता कुमार दास यांच्यासह कंपनीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (abetment to suicide) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळूरु येथे ही घटना घडली असून, कर्मचाऱ्याने लिहिलेल्या २८ पानी ‘सुसाईड नोट’ मध्ये कामाचा ताण, मानसिक छळ आणि वेतन थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मृत कर्मचाऱ्याचे नाव के. अरविंद (K Aravind) असून ते ओला इलेक्ट्रिकमध्ये ‘होमोलोगेशन इंजिनियर’ (Homologation Engineer) म्हणून कार्यरत होते. अरविन्द यांनी २८ सप्टेंबर रोजी कथितपणे विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून, ६ ऑक्टोबर रोजी सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्यात भाविश अग्रवाल, सुब्रता कुमार दास आणि ओला इलेक्ट्रिक कंपनीविरोधात BNSS कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. ही एफआयआर (FIR) आता उघड झाली आहे.
पोलिसांनी अरविंद यांच्या खोलीची झडती घेतली असता, त्यांना २८ पानांची एक ‘सुसाईड नोट’ मिळाली. यात त्यांनी सुब्रता कुमार दास आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर मानसिक छळ, कामाचा अवाजवी ताण आणि पगार तसेच देयके न दिल्याने आत्महत्या करत असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद (UDR) केली होती, पण अरविन्द यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्यांच्या खात्यात १७.४६ लाख रुपये जमा झाल्याचे समोर आल्याने संशय वाढला. कंपनीच्या मनुष्यबळ (HR) विभागाकडून मिळालेल्या अस्पष्ट उत्तरांमुळे कुटुंबीयांच्या शंका बळावल्या.
कंपनीचे उत्तर –
या घटनेनंतर ओला इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “आमचे सहकारी अरविंद यांच्या निधनाने आम्ही खूप दुःखी आहोत आणि या कठीण काळात आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.” अरविन्द हे साडेतीन वर्षांहून अधिक काळ कंपनीत होते, पण त्यांनी त्यांच्या नोकरीबद्दल किंवा कोणत्याही छळाबद्दल कधीही तक्रार केली नव्हती. त्यांची भूमिका कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाशी, विशेषतः प्रवर्तकांशी, थेट संवाद साधण्याची नव्हती. कुटुंबियांना तातडीने मदत मिळावी यासाठी पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करण्यात आले. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
तसेच ओला इलेक्ट्रिकने कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court) एफआयआरला आव्हान दिले असून, कंपनी आणि तिच्या अधिकाऱ्यांच्या बाजूने संरक्षक आदेश (protective orders) प्राप्त झाले आहेत. कंपनी या चालू तपासात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित व सन्मानजनक कामाचे वातावरण राखण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.





