सुशील कुमारसाठी तेलही गेले तूपही गेले

नवी दिल्ली -युवा कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर आल्याने दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता व या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला सुशील कुमार आता चांगलाच गोत्यात आला आहे.
अटक तर झालीच, आता त्याची नोकरीही जाणार याचीही निश्चिती झाल्यामुळे एक ऑलिम्पिक पदकविजेता खेळाडू गुन्हेगार ठरला.
सागरच्या शवविच्छेदन अहवालानुसार सागरच्या शरीरावर अनेक ठिकाणी निळ्या रंगाचे अंश आढळले होते व त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.
सागर राणा याला बीजीआरएम रुग्णालयात नेण्यात आले, तसेच आणि नंतर ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात ऑलिम्पिक स्पर्धेत पदकविजेते सुशील कुमार आणि अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
त्याचा व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने सील करण्यात आले आहेत. आता या प्रकरणामुळे सुशील कुमारची ऑलिम्पिकमधीलच नव्हे तर एकूणच कुस्तीतील कारकीर्द संपुष्टात आली आहे.
छत्रसाल अकादमीत सुशील कुमारला मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, त्याने आपली जबाबदारी तर सांभाळली नाहीच पण त्याच्यावर हत्येसारखा गंभीर गुन्हा नोंदला गेल्याने कुस्ती क्षेत्रात भारताची बदनामीदेखील केली.
आता त्याला मिळालेली सर्व पदके व पुरस्कार गमवावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय कुस्ती महासंघदेखील त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
कठोर शिक्षेची सागरच्या कुटुंबीयांची मागणी
सागरच्या कुटुंबाने याप्रकरणी योग्य तपास व्हावा अशी मागणी केली असून, सुशील कुमारला फासावर लटकवा, अशीही मागणी सागरच्या परिवाराने केली आहे.
नोकरीही गेली
सुशील कुमारला उत्तर रेल्वेतील नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. अटकेनंतर सुशील कुमारच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता होतीच. दिल्ली सरकारने सुशीलची डेप्युटेशन वाढविण्याची मागणी फेटाळली.
दिल्ली सरकारने त्याचा अर्ज फेटाळून लावला असून, तो कार्यरत असलेल्या उत्तर रेल्वे विभागात पाठविला होता. 2015 सालापासून सुशील दिल्ली सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होता आणि त्याचा कार्यकाळ 2020 सालापर्यंत वाढविण्यात आला होता.





