दुबई : ओमानच्या आखाताजवळ एक तेलवाहू जहाज बुडाल्यामुळे 16 जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये १३ भारतीय खलाशी आहेत. कोमोरोजचा ध्वज असलेले हे जहाज मंगळवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ डुक्मच्या विलायतमधील रास मद्राकाच्या आग्नेयेला २५ सागरी मैलांवर असताना बुडाले. संबंधित अधिकृत संस्थांमधील समन्वयाने मदत आणि बचाव कामाला सुरुवात करण्यात आली आहे, असे ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने सांगितले. प्रेस्टिज फाल्कन असे बुडालेल्या जहाजाचे नाव होते. त्यावरील 16 खलाशांमध्ये १३ भारतीय आणि ३ श्रीलंकेचे खलाशी होते. हे सर्व खलाशी अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. जहाज दुबईतील हमरिया बंदरातून निघाले होते आणि येमेनमधील एडन बंदराकडे जात होते. डुक्म पोर्ट हे ओमानच्या तेल आणि वायू खाण प्रकल्पांचे प्रमुख केंद्र आहे.