तेलाची परतफेड चहातून

कोलंबो – श्रीलंकेने इराणकडून घेतलेल्या 251 दशलक्ष डॉलरच्या तेलाच्या किमतीची परतफेड चहाच्या माध्यमातून करायचे ठरवले आहे. इराणकडून पूर्वी घेतलेल्या तेलाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी श्रीलंकेने हा उपाय निवडला आहे. इराणवरील आर्थिक निर्बंध आणि श्रीलंकेतील परदेशी गंगाजळीची टंचाई पाहता हा पर्याय निवडला गेला आहे.
इराणच्या “ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन’च्या प्रतिनिधींबरोबर श्रीलंकेच्या प्रतिनिधींनी एका सामंजस्य करारावर अलीकडेच स्वाक्षऱ्या केल्या आहेत. श्रीलंकेने इराणकडून घेतलेल्या 251 दशलक्ष डॉलरच्या तेलाच्या कर्जाची परतफेड तितक्याच किमतीच्या चहाच्या स्वरूपात केली जाणार आहे, असे या करारात म्हटले आहे.
कर्जाची परतफेड होईपर्यंत दरमहा 5 दशलक्ष किमतीचा चहा इराणला निर्यात करण्याचा प्रस्ताव श्रीलंकेच्या वृक्षारोपण मंत्रालयाचे अध्यक्ष रमेश पाथिराना यांनी दिला आहे. श्रीलंकेतील सायलॉन पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडून इराणच्या नॅशनल पेट्रोलियम कंपनीला 250.9 दशलक्ष डॉलरचे देणे बाकी आहे. इराणच्या बॅंकांशी कोणतेही व्यवहार करण्यास अमेरिकेकडून निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे या कर्जाची तडजोड करणे श्रीलंकेला शक्य होत नाही. मात्र, नवीन करारातून या निर्बंधांचा कोणताही भंग होत नाही.





