Oil Price on US Iran Conflict: कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलरपार जाणार? इतिहासातील सर्वात मोठ्या तेल पुरवठा संकटाची भीती
Oil Price on US Iran Conflict: १ मार्च रोजी होर्मुझमधून केवळ ५ तेलटँकर गेले, जेथे दररोज सुमारे ६० टँकर जात होते. 'कमोडिटीज अॅट सी'च्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.

Oil Price on US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगाच्या तेल पुरवठ्यावर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. S&P ग्लोबल एनर्जीने आपल्या अहवालात इशारा दिला आहे की हे युद्ध इतिहासातील सर्वात मोठी तेल पुरवठा बाधा ठरू शकते. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक मंदावली किंवा पूर्णपणे थांबली तर परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते.
होर्मुझमधून किती तेल जाते?
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग आहे. चालु वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत दररोज सुमारे २.०८ कोटी बॅरल कच्चे तेल आणि इतर उत्पादने याच मार्गाने पाठवली गेली. यापैकी ८२ टक्के माल आशियाई बाजारांमध्ये पोहोचला. जगातील सुमारे १८ टक्के द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) पुरवठाही याच मार्गाने होतो.
टँकरची संख्या ६० वरून ५ वर –
१ मार्च रोजी होर्मुझमधून केवळ ५ तेलटँकर गेले, जेथे दररोज सुमारे ६० टँकर जात होते. ‘कमोडिटीज अॅट सी’च्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. ही घसरण एक आठवडा कायम राहिली तर ते ऐतिहासिक मानले जाईल आणि त्यापुढे गेल्यास जागतिक तेल बाजारात मोठी उलथापालथ होईल, असे S&P ग्लोबलने म्हटले आहे.
१.५ कोटी बॅरल धोक्यात –
टँकरची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यास दररोज सुमारे १.५ कोटी बॅरल कच्चे तेल आणि इतर उत्पादने अडकू शकतात. मात्र सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींच्या पाइपलाइनद्वारे काही तेल वळवता येऊ शकते, त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान किती होईल हे त्या पाइपलाइन किती क्षमतेने चालतात यावर अवलंबून असेल. अनेक महिने दररोज ७० ते ८० लाख बॅरलची कमतरता राहिली तर ते रशिया-युक्रेन युद्ध किंवा १९९० च्या आखाती युद्धातील धोक्यापेक्षाही मोठे संकट ठरेल.
तेलाचा भाव १०० डॉलरपार जाण्याची शक्यता –
S&P ग्लोबल एनर्जीच्या मते, अल्पकाळात तेलाच्या किमतींमध्ये मोठे चढउतार राहतील. बातम्या, अफवा आणि भीतीपोटी होणाऱ्या खरेदीमुळे किमती प्रभावित होत राहतील. होर्मुझमधून पुरवठा पुन्हा सुरळीत झाला, मात्र इराणची निर्यात वगळली तर येत्या काही महिन्यांत कच्च्या तेलाचा भाव सुमारे ८० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहू शकतो. परंतु अनेक महिने दररोज ७० लाख बॅरलची कमतरता कायम राहिल्यास भाव १०० डॉलर प्रति बॅरलवर किंवा त्यापुढेही जाऊ शकतो, कारण मर्यादित पुरवठ्यामुळे मागणी नियंत्रणात ठेवणे अपरिहार्य होईल. ज्या बाजारांमध्ये तेलसाठा कमी आहे, त्यांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसेल. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा इराणने केली आहे.





