Ajit Pawar : ‘ओ चौबे, हे बरोबर नाही, असं मूर्खासारखं…; अजित पवारांनी आयुक्तांना खडसावलं, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्रातील पुणे -नाशिक आणि तळेगाव -शिक्रापुर या दोन महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपायोजनांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाची संवाद साधत वाहूतक कोंडीसंदर्भातील समस्या जाणून घेतल्या. आज सकाळी ६ वाजता अजित पवारांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली.
पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी- चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलिस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ‘ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीये?, सगळी वाहतूक सुरु करा.’, अशा शब्दांत अजित पवारांनी पोलिस आयुक्तांना सुनावलं. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
थेट खड्ड्यांचे फोटोच दाखविले
चाकण औद्योगिक क्षेत्राची प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी येथे मोठ्या प्रमाणावर वाहने ये जा करत असतात. त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्त्यावरील खड्डे हा देखील गंभीर विषय आहे. या खड्ड्यांमुळे अपघांताना आमंत्रण मिळतं. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अपघातांची भीती व्यक्त केली.
अजित पवारांकडून संकेत
तसेच चाकणमध्ये महापालिका आणण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. चाकणला महानगर पालिका करायचं चाललंय. बारामतीची तुलना चाकणशी करू नका, असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी हजर होते. यावेळी अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.





