Santosh Deshmukh murder case : बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवं नवीन खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर आता अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून ऑफिस बॉयने आपल्या जबाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ६ डिसेंबर २०२४ला आवादा प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेने गोंधळ घातला होता. तसेच संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्याने जबाबात सांगितले आहे. या ऑफिस बॉयच्या जबाबामुळे संपूर्ण कराड गँगचा टप्प्यात कार्यक्रम झाला आहे. (Walmik Karad) ऑफिस बॉयचा जबाब काय? ६ डिसेंबर २०२४ रोजी आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला होता. यावेळी सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी वॉचमन गेले असता, आरोपींनी त्यांना मारहाण केली. याच दरम्यान सुदर्शन घुले याने “मी वाल्मीक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये खंडणी द्या.. नाहीतर कंपनी बंद करा”, अशी धमकी दिली होती. घुलेच्या इतर साथीदारांनी देखील दमदाटी केली होती. हा वाद सुरू असताना तिथे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले. त्यांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली होती. मात्र सुदर्शन घुलेने सरपंचांना धमकी दिली. “सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिली होती. या ऑफिस बॉयच्या जबाबाने वाल्मीक कराड गँग पुरती अडकली आहे. (Santosh Deshmukh murder case) होय, आम्हीच केला खून; सुदर्शन घुलेची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुदर्शन घुले याने, ‘होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून केला’, अशी कबुली पोलिसांना दिली आहे. आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनता होता. तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली. तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडीओ शुट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत.