पुणे | अनधिकृत बांधकाम धारकावर गुन्हे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी (ता. मुळशी) आणि मांजरी (ता. हवेली) भागातील अनधिकृत बांधकाम धारकावर गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
तत्पुर्वी संबंधितांना अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत नोटीस बजावली होती. पण त्या नोटीसचे पालन न केल्याने शेवटी दोघांवर पीएमआरडीएकडून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.
हिंजवडी येथील एका अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशन तर मांजरी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या महिलेविरोधात हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित बांधकामधारकांना पीएमआरडीएकडून वेळोवेळी अनधिकृत बांधकाम थांबविणेसाठी नोटीसद्वारे कळवले होते.
पण, बांधकामधारक यांनी प्राधिकरणाच्या नोटीसचे अनुपालन न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 54(2) अन्वये हिंजवडी आणि हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील मालमत्ताधरकांनी परवानगी घेवूनच आपली बांधकामे करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.
यासह सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तत्काळ थांबवावीत. अन्यथा, संबंधितांवर उक्त नियमाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी स्पष्ट केले.
शिक्षेची तरतूद…
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 नुसार अनधिकृत बांधकाम धारकास अनधिकृत बांधकाम थांबविण्याची नोटीस दिल्यानंतर सदर बांधकाम न थांबविल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.




