ओडिशाहून दिल्ली एम्समध्ये एअरलिफ्ट केलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू ; पुरीमध्ये 3 जणांकडून पेटवून हत्या

Odisha Minor Girl Death। ओडिशातील पुरी याठिकाणी तीन गुन्हेगारांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यांनतर तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला जाळून टाकल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर आज त्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी याविषयी सांगताना सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, “पुरी जिल्ह्यात ३ अज्ञात हल्लेखोरांनी एका १५ वर्षीय मुलीला जाळल्याचा आरोप आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, १९ जुलै रोजी सकाळी पुरी जिल्ह्यातील भार्गवी नदीच्या काठावर ३ अज्ञात व्यक्तींनी मुलीचे अपहरण करून तिला जाळून टाकल्याचा आरोप आहे. तिच्या आईने बालंगा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, अल्पवयीन मुलगी एका मैत्रिणीला भेटल्यानंतर तिच्या घरी जात असताना ही घटना घडली. तीन लोकांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला जाळून टाकले.” असे म्हटले आहे.
ओडिशा पोलिसांनी दिल्ली एम्समध्ये जबाब नोंदवला Odisha Minor Girl Death।
पीडित ७० टक्क्यांहून अधिक भाजली होती. तिला प्रथम १९ जुलै रोजी पिपली कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आले. नंतर त्याच दिवशी तिला विमानाने एम्स, भुवनेश्वर आणि दुसऱ्या दिवशी विमानाने एम्स, दिल्ली याठिकाणी नेण्यात आले, ज्याठिकाणी तिच्यावर किमान दोन ‘शस्त्रक्रिया’ आणि ‘त्वचा कलम’ करण्यात आले. ओडिशा पोलिसांनी शुक्रवारी दिल्ली एम्समधील दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदवला.
ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले?
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये माझी म्हणाले, “बलंगा परिसरातील पीडितेच्या मृत्यूची बातमी ऐकून मला खूप धक्का बसला आहे. सरकारच्या सर्व प्रयत्नांना आणि दिल्लीस्थित एम्सच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या अहोरात्र प्रयत्नांना न जुमानता, तिचा जीव वाचवता आला नाही. मी पीडितेच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो आणि तिच्या कुटुंबाला हे अपूरणीय नुकसान सहन करण्याची शक्ती देवाला देतो अशी प्रार्थना करतो.” ओडिशाचे उपमुख्यमंत्री केव्ही सिंह देव आणि पी. परिदा यांनीही पीडितेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनीही अल्पवयीन पीडितेच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबाला सांत्वन दिले. राज्यसभा सदस्य सस्मित पात्रा यांच्या नेतृत्वाखाली बीजेडी खासदारांच्या शिष्टमंडळाने सांगितले की ते दिल्लीतील एम्समध्ये जात आहेत.
पोलिसांनी काय म्हटले? Odisha Minor Girl Death।
ओडिशा पोलिसांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि पीडितेला जाळण्याच्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे असा दावा केला. पोलिसांनी या घटनेत इतर कोणीही सहभागी नसल्याचा दावा केला आणि सर्वांना या प्रकरणावर कोणतेही खळबळजनक विधान करू नये असे आवाहन केले.
ओडिशा पोलिसांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बलंगा घटनेत पीडित मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आहे. पोलिसांनी पूर्ण प्रामाणिकपणे तपास केला आहे. तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, यात इतर कोणीही सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून, या दुःखद क्षणी या प्रकरणाबद्दल कोणतीही संवेदनशील टिप्पणी करू नये अशी आम्ही सर्वांना विनंती करतो.”
ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटी (OPCC) चे अध्यक्ष भक्त चरण दास यांनी शोक व्यक्त केला.तसेच ७ दिवसांत तीन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली. दास म्हणाले, ‘जर सात दिवसांत गुन्हेगारांना पकडले गेले नाही तर आम्ही डीजीपी कार्यालयाला घेराव घालू.’ ते म्हणाले की, मुलीला जाळण्याच्या घटनेला १५ दिवस उलटून गेले आहेत, परंतु या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही गुन्हेगारांना पोलिस अटक करू शकलेले नाहीत. दरम्यान, पुरी पोलिसांनी बालंगा येथील मृत मुलीच्या घराजवळ काही पोलिस तैनात केल्याचे सूत्रांनी सांगितले.





