देखणे व्यक्तिमत्व आणि उत्तम इंग्रजी म्हणजे सर्व काही नसते

जयपुर – एखाद्याचे व्यक्तिमत्व देखणे असणे किंवा उत्तम इंग्रजी बोलता येणे म्हणजेच सर्व काहीं नसते अशा शब्दात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर शरसंधान साधले आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, तुमच्या मनात देशाविषयी, समाजाविषयी काय भावना आहेत, तुमचे तत्वज्ञान काय आहे, तुमची धोरणे काय आहेत आणि तुमची निष्ठा नेमकी कशाशी आहे याला फार महत्व आहे. सोन्याचा चाकू तुम्हाला जेवण्यासाठी वापरता येत नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पायलट यांचे नाव न घेता त्यांनी त्यांना हे टोमणे मारले.
गहलोत म्हणाले की, आम्ही चाळीस वर्ष राजकारणात आहोत, तथापि आमचेही नवीन पिढीवर प्रेम आहे, भविष्य त्यांच्याच हातात आहे. ही नवीन पिढी केंद्रीय मंत्री म्हणून काम करते, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांना काम करण्याची संधी मिळते, पण आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो तशा परिस्थितीतून ते गेले असते तर त्यांना काहीं गोष्टी समजू शकल्या असत्या.
जयपुर मध्ये आमदारांचा घोडेबाजार झाला. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत असेही गेहलोत यांनी नमूद केले. राजस्थानतील सत्तासंघर्षात आपला विजय झाल्याचे अप्रत्यक्षपणे नमूद करताना ते म्हणाले की आज अधिकृत पणे सरकारच्या पाठीशी 106 आमदार आहेत आणि बहुमतासाठी ते पुरेसे आहेत.





