Nagar | मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस

नगर, (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जुलै २०२४ या अर्हता तारखेवर आधारीत छायाचित्र मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
यात जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातून मतदार याद्याबाबत हरकतींचा पाऊस पडला असून तब्बल ३९ हजार २३१ आॅनलाइन व आॅफलाईन हरकती आल्या आहेत. सर्वाधिक नगर शहर मतदार संघातील तब्बल ५ हजार ३२९ हरकती आल्या असून प्रशासन अतिंम निर्णय घेणार आहे.
१८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांनी नावनोंदणीसाठी २२ हजार २३ अर्ज (नमुना ६) आले आहेत. तर
नावात बदल, पत्ता बदल करणे व स्थलांतर यासाठी नमुना ८ साठी ७ हजार ५७९ हरकती आल्या आहेत. मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावांची वगळणी करण्यासाठी ९ हजार ६१९ हरकती घेण्यात आल्या.
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात १९ जुलै २०२४ पर्यंत ३६ लाख ७३ हजार ९६९ मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ३६ लाख ५९ हजार २०१ मतदार होते. याबाबत नेवासे तालुक्यातील सर्वाधिक १३ हजार मतदारांबाबत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आक्षेप घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आक्षेप घेतलेल्या १९ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यातील १३ हजार मतदारांची नावे पुन्हा विधान सभेसाठीच्या मतदार यादीमध्ये आली आहेत.
निवडणूक आयोग जाहीर केलेल्या छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमानुसार ६ ऑगस्ट २०२४ रोजी एकत्रिकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली. दि. ६ ते २० ऑगस्ट दरम्यान दावे व हरकती घेण्यात आल्या.
२९ ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. २९ ऑगस्ट, २०२४ रोजी अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे तसेच डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यीची छपाई करण्यात आहे. ३० ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.





