सावरकरांच्या छायाचित्राची उत्तर प्रदेश कॉंग्रेसलाही ऍलर्जी

लखनौ – महाराष्ट्रातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे खरे तर स्वातंत्र्यवीर नव्हतेच. ब्रिटिश साम्राज्याने केलेल्या अनेक अत्याचार सहन करुनही त्यांच्यासमोर न झुकलेल्या आणि हाल अपेष्टा सहन करुनही भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिलेल्या या स्वातंत्र्यसेनानींच्या मालिकेमध्ये सावकरांचा फोटो लावणे हा स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या महान क्रांतीकारकांचा अपमान आहे, असे सांगत उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचे आमदार दिपत सिंग यांनी सावरकरांचा फोटो विधानसभेच्या कक्षामध्ये लावण्यावरुन आक्षेप घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं असून हा फोटो काढण्याची मागणी केली आहे.
सिंग यांनी विधानसभेचे अध्यक्ष रमेश यादव यांना यासंदर्भात पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ब्रिटीश साम्राज्यासमोर झुकत त्यांची माफी मागणाऱ्या सावरकरांचे छायाचित्र तातडीने हटवले जावे. मंगळवारीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या फोटोचे अनावरण करण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच सिंग यांनी हे पत्र लिहिलं आहे.
सावरकरांच्या या प्रतिमेचे अनावरण करताना योगी आदित्यनाथ यांनी सावरकर हे थोर स्वातंत्र्यसेनानी होते तसेच सावरकरांच्या व्यक्तीमत्वामुळे आजही भारतीयांना प्रेरणा मिळत असल्याचं म्हटलं होतं.
सावरकरांचा फोटो काढून तो भाजपाच्या कार्यालयामध्ये लावावा असंही सिंग यांनी म्हटलं आहे. याच संदर्भात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, देशातील तरुणांमध्ये यासंदर्भात चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोण लढलं आणि कोणी यामध्ये योगदान दिलं हे स्पष्ट होईल. तेव्हाच आपण या लढ्यात सहभागी झालेल्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे, असं यादव म्हणाले.





