पुणे जिल्हा | जुन्नरमध्ये 1455 मिळकतधारकांचे आक्षेप

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण 8 हजार 607 मिळकती असून यापैकी 1455 मिळकतधारकांनी नगरपरिषदेच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी बाबतचे आक्षेप अर्ज नगरपरिषद कार्यालयामध्ये दाखल केल्याचे माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली.
जुन्नर नगरपरिषदेने अमरावती येथील एका खासगी कंपनीला ठेका देऊन शहरातील मालमत्ताची सर्वेक्षण करून कर आकारणी केली होती. त्यानंतर सुधारित कर मूल्यांकनाबाबतच्या नोटीस मालमत्ता धारकांना देण्यात आल्या होत्या. यामध्ये कर मंजूर दरापेक्षा जादाची करवाढ केल्याबाबतच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या.
याबाबत लेखी हरकती आक्षेप करण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले होते. त्यानुसार 1455 मिळकत धारकांनी आपले आक्षेप हरकती लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयात निर्धारित वेळेमध्ये केले होते. त्यामध्ये कर मान्य नाही आक्षेप अर्ज 1318, फेर तपासणी, फेर मोजणी आक्षेप अर्ज 115, फेरफार अर्ज 13, किरकोळ अर्ज 9 या प्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत.
या दाखल हरकतींवर नगररचना विभाग पुणे यांच्या अधिकाराखाली सुनावणी येत्या काही दिवसात होणार आहेत. दरम्यान, जुनी घरपट्टी भरण्याबाबतच्या नोटिसा नागरिकांना देण्यात आलेल्या असून या नोटीसी प्रमाणे कराचा भरणा 31 जुलै पर्यंत करावा. 1 ऑगस्ट पासून 2 टक्के दंड रकमेची कारवाई सुरू होणार असल्याने नागरिकांनी मुदतीमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी कराचा भरणा करण्याचे आवाहन नगरपरिषद कर संकलन अधिकारी दत्तात्रय सुतार यांनी केलेले आहे.





