बारामतीत ओबीसींचा एल्गार; लक्ष्मण हाकेंचा शरद-अजित पवारांवर हल्लाबोल, प्रकाश आंबेडकरांचा फोनिक संदेश

बारामती : मराठा आरक्षणाच्या सरकारी निर्णयाविरोधात (GR) ओबीसी समाजाने बारामतीत एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील हजारो ओबीसी बांधवांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. “शरद पवारांनीच मनोज जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं,” असा गंभीर आरोप हाके यांनी केला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे ओबीसी समाजात असंतोष पसरला असून, बारामतीत आयोजित एल्गार मेळाव्यात ओबीसी नेत्यांनी सरकार आणि पवार कुटुंबीयांवर हल्ला चढवला. लक्ष्मण हाके यांनी फडणवीसांवर टीका करताना म्हटलं, “मराठा आंदोलकांसमोर फडणवीसांनी लोटांगण घातलं.” त्यांनी ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार नाही, यासाठी रस्त्यावरील आणि कायदेशीर लढाई तीव्र करण्याचा इशारा दिला.
हाके यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांना ४०० संस्थांचे अध्यक्ष आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारे नेते संबोधले. “शरद पवार मतं ओबीसींची घेतात आणि जरांगेंना पाठिंबा देतात,” असा आरोप त्यांनी केला. अजित पवारांवरही हाके यांनी निशाणा साधला. “कॅनलचं कंपाऊंड तुझ्या बापाचं आहे का?” असा सवाल करत त्यांनी अजित पवारांना ओबीसींच्या हक्कांविरुद्ध काम करणारे नेते ठरवलं. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली, तर नवनाथ वाघमारे यांनी पवार कुटुंब मराठा आरक्षणाला रसद पुरवत असल्याचा आरोप केला.
मेळाव्यादरम्यान लक्ष्मण हाके यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. स्पीकर फोनवर बोलताना आंबेडकर म्हणाले, “सध्याचं सरकार भांडण लावणारं आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने २०२१ मध्ये रद्द केला आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेटचा आधार घेणं ही सरकारची पळवाट आहे. ओबीसींना रस्त्यावर उतरावं लागेल.” त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मत न देण्याचं आवाहन केलं.
ॲड. मंगेश ससाने यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा विश्वास व्यक्त केला. “हा जीआर बेकायदेशीर आहे. आम्ही न्यायालयात विजय मिळवू,” असं ते म्हणाले. विश्वासराव देवकाते यांनी मराठा आरक्षणाला विरोध नसला, तरी ओबीसी कोट्यात घुसखोरी खपवून घेणार नाही, असं स्पष्ट केलं. भाजप नेते नवनाथ पडळकर यांनी बारामतीला मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरवत पवार कुटुंबावर टीका केली आणि जोपर्यंत जीआर मागे घेतला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा दिला.
मनोज जरांगे यांनी धनगर समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांवरून ॲड. अमोल सातकर आणि किशोर मासाळ यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सातकर यांनी बारामतीतील प्रशासन अजित पवारांच्या मर्जीनुसार काम करत असल्याचा आरोप केला. ॲड. गोविंद देवकाते यांनी सरकारच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आणि जाणीवपूर्वक ओबीसींविरुद्ध व्यवस्था निर्माण केली जात असल्याचं सांगितलं.
मेळावा भिगवण चौकातून सकाळी १०:३० वाजता निघाला आणि अहिल्यादेवी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करत प्रशासकीय भवनापर्यंत पोहोचला. किशोर मासाळ यांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत प्रशासकीय भवनासमोर अमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. पांडुरंग मेरगळ यांनी राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचं आवाहन केलं, तर बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी यांनी राजकीय एकजुटीचं महत्त्व अधोरेखित केलं.





