Navnath Waghmare | ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची चार चाकी स्कॉर्पिओ गाडी एका अज्ञात व्यक्तीने पेटवली. जालनामधील नीलम नगर भागात रात्री ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ही आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसते की, नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर त्यांची कार नेहमीप्रमाणे उभी होती. एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला आणि गाडीवर टाकलेल्या कव्हरवर पहिल्यांदा त्याने कॅनमध्ये असलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले आणि त्यानंतर आग लावून दिली. अचानक गाडीतून धूर निघून आगीचा भडका उडाल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ आरडाओरडा करून वाघमारे यांना माहिती दिली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप या घटनेनंतर नवनाथ वाघमारे यांनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. नवनाथ वाघमारे यांनी ‘माझी गाडी जाळली हा जरांगे समर्थकांचा कट असून यापुढे जरांगे यांच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका,’ असा थेट इशाराच दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही वाघमारे यांनी केली आहे. Navnath Waghmare | हेही वाचा: ट्रम्पचा H1B ‘व्हिसा बॉम्ब’ फसला ; जीएसटी सवलत ठरली वरचढ, शेअर बाजार जोरदार सावरला