वाल्मीक कराडची बाजू का घेता म्हणत माईक हिसकावले; लक्ष्मण हाकेंचे भाषण थांबवले अन्…

परभणी – बीड प्रकरणात वाल्मीक कराड तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र, या आक्रोश आंदोलनाच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनी मोर्चा काढला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर वाल्मीक कराडचे समर्थन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
येथे मृत सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीतर्फे गेल्या 25 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. या धरणे आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज उपस्थित होते. मात्र, त्यांचे भाषण सुरू असताना आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण हाके यांचे भाषण थांबवत तुम्ही वाल्मीक कराडची बाजू घेता, तुम्ही भाजपचे हस्तक असून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत असल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप केला.
यावेळी आरपीआयचे नेते सचिन खरात यांनी तुम्ही चळवळीतील नेते आहात, तुम्ही वाल्मीक कराडची बाजू घेऊ नका अन्यथा आम्ही तुमच्यासोबत नाहीत असा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी यावर स्पष्टीकरण देखील दिले. आक्रमक आंदोलकांना स्पष्टीकरण देताना लक्ष्मण हाके म्हणाले, मी ना भाजपचा हस्तक आहे, ना कार्यकर्ता, मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतली नाही. त्यांच्यासोबत केवळ माझेच फोटो नाहीत, तर शरद पवार, मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांचाही फोटो आहे.
मी इथे सोमनाथ सूर्यवंशी यांची खाकी वर्दीकडून हत्या झाली त्यामुळे 450 किलोमीटरवरून सोमनाथ आणि वाकोडे साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो असल्याचे हाके यांनी सांगितले. तेव्हाच एका आंदोलकाने कोणीही येथे बाहेरून येऊन राजकारण करू नये असे सचिन खरात व लक्ष्मण हाके यांना उद्देशून म्हंटले आहे.





