Nusrat Bharucha : ऑक्सिजन सपोर्टवर नुसरत भरुचा; एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत परतली, चिंता वाढवणारा व्हिडिओ समोर
Nusrat Bharucha : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नुसरत स्ट्रेचरवर दिसत असून तिला ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आल्याचे पाहायला मिळते.

Nusrat Bharucha Health Update : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. इंडोनेशियातील बाली येथे तिचा अपघात झाला असून या दुर्घटनेत तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. बाली येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नुसरतला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आले असून तिच्यावर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नुसरत स्ट्रेचरवर दिसत असून तिला ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रपरिवार चिंतेत आहेत. मात्र, व्हिडिओमध्ये नुसरत शुद्धीवर असून उपस्थितांशी संवाद साधताना दिसत आहे.
नुसरत कामानिमित्त तसेच सुट्टीसाठी बालीला गेली होती. याचदरम्यान तिचा अपघात झाला. पाठीच्या कण्याला गंभीर फ्रॅक्चर झाल्याने बालीमध्ये तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, पुढील उपचार आणि तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज असल्याने तिला मुंबईत आणण्यात आले.
नुसरतच्या पीआर टीमने अधिकृत निवेदन जारी करत तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेमुळे नुसरतला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही काळ विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि कामाच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नुसरत लवकरच अभिनेता टायगर श्रॉफसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार होती. मात्र, चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच झालेल्या या अपघातामुळे चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नुसरत भरुचा नुकतीच ‘उफ्फ ये सियापा’ या विनोदी चित्रपटात दिसली होती. तिच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि बॉलिवूडमधील कलाकार ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.






