पंजाब : विषारी दारू बळींची संख्या 80 वर; तक्रार देण्यास कोणीच पुढे येईना

चंदिगड – पंजाबमध्ये विषारी दारू पिऊन मरण पावलेल्यांची संख्या आता तब्बल 80 वर गेली आहे. तरतारण जिल्ह्यात या दारूमुळे आज आणखीन 42 जण मरण पावले. शुक्रवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा केवळ 19 होता. त्यात आता जवळपास तिप्पट वाढ झाली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, विषारी दारूमुळे तरतारण जिल्ह्यात एकूण 42 जण, अमृतसर जिल्ह्यात एकूण 11 जण आणि बटाला येथे 9 जण आत्तापर्यंत मरण पावले आहेत. या प्रकरणात तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नसल्याने पोलिसांची अडचण वाढली आहे.
मृतांच्या नातेवाईकांनीही तक्रारीस नकार दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी मृतांचे पोस्टमार्टेमही करण्यास विरोध दर्शवला आहे. गुरुदासपूरच्या उपायुक्तांनी तर सांगितले की, काही मृतांच्या नातेवाईकांनी आपल्या इसमाचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याचेच मान्य करण्यास नकार दिला आहे. अनेकांच्या कुटुंबीयांनी आपल्या घरातील संबंधित इसमाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.
काही मृतांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना न कळवताच घरातील मृत इसमाचा अंत्यविधी उरकला आहे. या साऱ्या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा मात्र गोंधळून गेली आहे. संबंधित नातेकवाईकांवर नेमका कोणाचा दबाव आहे याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे.





