Stock Exchange : NSEची मोठी कामगिरी; जागतिक तिसरी सर्वात मूल्यवान शेअर बाजार चालवणारी ठरली कंपनी
Stock Exchange : भारताच्या NSE ने डॉयचे बोर्से आणि लंडन स्टॉक एक्सचेंजला मागे टाकले. २६ नोव्हेंबरला शेअरने २,४०० रुपयांचा उच्चांक गाठला.

Stock Exchange : भारताच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) जागतिक स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. बाजारमूल्याच्या बाबतीत एनएसई जगातील तिसरी सर्वात मूल्यवान शेअर बाजार चालवणारी कंपनी ठरली आहे. या कामगिरीसह एनएसईने जर्मनीच्या डॉयचे बोर्से आणि ब्रिटनच्या लंडन स्टॉक एक्सचेंजला मागे टाकले आहे.
२६ नोव्हेंबर रोजी एनएसईच्या शेअरने २,४०० रुपयांचा ५२ आठवड्यांतील उच्चांक गाठला. त्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य सुमारे ५.९२ लाख कोटी रुपये म्हणजेच ६४.१ अब्ज डॉलरवर पोहोचले. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.
जगातील सर्वाधिक मूल्यवान एक्सचेंज कंपन्यांमध्ये अमेरिकेचा CME ग्रुप पहिल्या, इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज दुसऱ्या आणि एनएसई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
एनएसईच्या शेअरमध्ये तेजी का?
भारतीय शेअर बाजारातील वाढते व्यवहार, गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि एनएसईची मजबूत बाजारातील पकड ही तेजीची प्रमुख कारणे आहेत. कंपनीच्या आयपीओसंबंधी कागदपत्रांनुसार, २०२५-२६ मध्ये जगातील इक्विटी कॅश व्यवहारांमध्ये एनएसईचा वाटा ११.४ टक्के, तर इक्विटी डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमध्ये ५१.२ टक्के होता.
गुंतवणूकदारांनी काय समजून घ्यावे?
एनएसई जगातील तिसरी सर्वात मोठी शेअर बाजारपेठ बनलेली नाही, तर शेअर बाजार चालवणारी तिसरी सर्वाधिक मूल्यवान कंपनी ठरली आहे. शेअर बाजारावर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण मूल्य आणि एक्सचेंज चालवणाऱ्या कंपनीचे बाजारमूल्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
टीप : शेअरच्या किमतीत चढ-उतार होऊ शकतात. ही बातमी गुंतवणुकीचा सल्ला नाही.





