NSE IPO : देशातील सर्वात मोठा एनएसईचा आयपीओ 18 सप्टेंबरला ? 30 हजार कोटी रुपये उभारले जाणार
NSE IPO : एनएसईचा सुमारे 30 हजार कोटी रुपयांचा आयपीओ 18 सप्टेंबरला खुला होण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबरला लिस्टिंग होण्याची शक्यता असून हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.

NSE IPO : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (एनएसई) सुमारे 30 हजार कोटी रुपयांचा आयपीओ 18 सप्टेंबरला खुला होण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबरला एनएसईचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता असून, याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एनएसईच्या आयपीओचा प्राइस बँड 15 सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 17 सप्टेंबरला अँकर बुक खुले केले जाऊ शकते. आयपीओ 18, 21 आणि 22 सप्टेंबरला गुंतवणुकीसाठी खुला राहण्याची शक्यता आहे. मात्र, एनएसईकडून अद्याप या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या आयपीओतून सुमारे 30 हजार कोटी रुपये उभारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2024 मध्ये आलेल्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या 27,870 कोटी रुपयांच्या आयपीओला मागे टाकत एनएसईचा प्रस्ताव देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.
या ऑफरमध्ये प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याचे 14.89 कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. हे शेअर्स एनएसईच्या पेड-अप इक्विटी कॅपिटलच्या जवळपास 6 टक्के आहेत. या आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. त्यामुळे आयपीओतून मिळणारा निधी थेट एनएसईला मिळणार नसून विद्यमान भागधारकांना मिळणार आहे.





