आजपासून ‘या’ लोकांचे UPI खाते होणार बंद; Google Pay, PhonePe, Paytm चा वापर करता येणार नाही

UPI New Rules | जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm सारख्या ॲप्समधून UPI पेमेंट करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजपासून (1 एप्रिल) यूपीआयसंदर्भात नवीन नियम लागू झाले आहेत. या नियमांनुसार, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) बऱ्याच काळापासून निष्क्रिय (Inactive) असलेल्या सर्व मोबाईल नंबर्सला बँक खात्यातून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
NPCI ने हे पाऊल सायबर फ्रॉड आणि फसवणूक रोखण्यासाठी उचलले आहे. अनेकदा निष्क्रिय झालेले मोबाईल नंबर टेलिकॉम कंपन्या दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा जारी करतात, ज्यामुळे बनावट व्यवहार होण्याची शक्यता वाढते. तुमच्या बँक खात्यालाही जर कोणताही जुना किंवा निष्क्रिय मोबाईल नंबर लिंक असेल, तर तो त्वरित अपडेट करा. अन्यथा, तुम्हाला UPI पेमेंट करण्यात अडचणी येऊ शकतात.
सायबर फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता NPCI ने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जे मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून वापरले जात नाहीत किंवा पूर्णपणे बंद झाले आहेत, त्यांना बँकिंग आणि UPI प्रणालीतून काढून टाकणे आवश्यक आहे. निष्क्रिय नंबरमुळे तांत्रिक अडचणीही येत आहेत, ज्यामुळे UPI व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.
याशिवाय, जर टेलिकॉम कंपन्यांनी हे नंबर दुसऱ्या वापरकर्त्याला पुन्हा जारी केले, तर सायबर गुन्हेगार त्यांचा वापर फसवणुकीसाठी करू शकतात. याच कारणामुळे NPCI ने बँका आणि पेमेंट ॲप्सला या नंबर्सला सिस्टीममधून काढण्याचे निर्देश दिले आहेत.
मोबाइल नंबर बंद झाला असेल तर काय कराल?
जर तुमच्या बँक खात्याशी कोणताही जुना किंवा बऱ्याच काळापासून निष्क्रिय नंबर जोडलेला असेल, तर तो त्वरित तपासा. सर्वात आधी, तुमच्या टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरशी (Jio, Airtel, Vi, BSNL) संपर्क साधा आणि तुमचा नंबर अजूनही तुमच्या नावावर सक्रिय आहे की नाही याची खात्री करा.
जर नंबर बंद झाला असेल, तर त्याला त्वरित रिचार्ज करून सक्रिय करा किंवा बँकेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा.
NPCI ने बँका आणि UPI ॲप्सला दर आठवड्याला निष्क्रिय नंबरची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून १ एप्रिलनंतर असे सर्व नंबर बँकिंग प्रणालीतून काढून टाकले जातील. जर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय UPI पेमेंट करायचे असेल, तर तुमचा मोबाईल नंबर वेळेत अपडेट करा, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.





