आता तुमचे वाईट दिवस सुरू झाले; ट्रम्प यांची झेलेन्स्कींना थेट धमकी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज शांतता करारावरून जोरदार वाद झाला. तुम्ही आम्हाला आदेश देण्याच्या स्थितीत नाही अशा स्पष्ट शब्दांतच ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना सुनावल्यामुळे हा विषय गंभीर तर बनलाच पण जगभरात चर्चेचाही विषय ठरला. युक्रेन रशियासोबत शांतता करार करण्यास तयार नसल्यामुळे भडकलेल्या ट्रम्प यांनी झेलेन्कसींना व्हाइट हाउसच्या बाहेरच जाण्यास सांगितले.
झेलेन्स्की यांनी शुक्रवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धावर आणि अमेरिकेसाठीच्या खनिज करारांवर चर्चा केली. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसने दिलेल्या बातमीनुसार झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्यासमोर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिरी पुतिन यांचा उल्लेख दहशतवादी असा केला. जगाला खुनी व्यक्तीशी तडजोड करण्याची गरज नाही असेही त्यांनी म्हटले. मात्र युक्रेनला रशियासोबत शांतता करार करावा लागेल असे ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्पष्ट शब्दांत सांगितले.
ट्रम्प यांच्याकडून शांतता कराराचा उल्लेख आल्याने झेलेन्स्की संतापले आणि ट्रम्प यांच्याशी त्यांचा जोरदार वाद झाला. झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही कोणताही युद्धविराम स्वीकारणार नाही. यावर ट्रम्प त्यांना म्हणाले, तुमचा देश अडचणीत आहे. आम्ही काय करायचे हे तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळत आहात. तुम्ही आम्हाला आदेश देण्याच्या स्थितीत नाही. आम्ही तुम्हाला शस्त्रे दिली, ३५० अब्ज डॉलर्स. जर तुम्ही तडजोड केली नाही
तर आम्ही यातून बाहेर पडू
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असेही म्हटले की त्यांना आशा आहे की शांतता प्रस्थापित करणारे नेते म्हणून त्यांना लक्षात ठेवले जाईल. लोकांचे जीव वाचवण्यासाठी मला शांतता करार हवा आहे. आमच्यामुळे युक्रेन सुरक्षित आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद इतका तापला की अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांना हस्तक्षेप करावा लागला. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर झेलेन्स्की यांना धमकीही दिली. आजपासून तुमचे वाईट दिवस सुरू झाले आहेत असे त्यांनी झेलेन्स्कींना म्हटल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, चर्चा सुरू होण्यापूर्वी झेलेन्स्की म्हणाले होते की युद्धादरम्यानही नियम असतात. अमेरिका युद्धात होणाऱ्या हत्या थांबवू इच्छिते. डोनाल्ड ट्रम्प आमच्या बाजूने आहेत. झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना युद्धात रशियाने केलेल्या अत्याचारांचे फोटोही दाखवले. अमेरिकेचा पैसा युक्रेनमधील पुनर्बांधणीच्या विविध कामांसाठी वापरला पाहिजे. बैठकीत झेलेन्स्की यांनी अमेरिकेसोबतच्या खनिज कराराच्या बदल्यात सुरक्षा हमीची मागणी केली. तथापि, ट्रम्प म्हणाले की ते त्यांच्या सोयीनुसार खनिज साठ्यांचा वापर करतील.
झेलेन्स्कींनी म्हटले धन्यवाद
ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि वान्स यांची भेट व त्यानंतर झालेल्या वादानंतर व्हाइट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर, झेलेन्स्की यांनी युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याबद्दल ट्रम्प आणि अमेरिकेचे आभार मानले. बैठकीत ट्रम्प यांनी झेलेन्स्कीवर जोरदार टीका केली आणि त्यांच्यावर लाखो जीव धोक्यात घालण्याचा आरोप केला आणि त्यांच्या कृतींमुळे तिसरे महायुद्ध भडकू शकते असे म्हटले. त्याला प्रत्युत्तर म्हणून झेलेन्स्की अमेरिकेसोबतच्या महत्त्वाच्या खनिज करारावर स्वाक्षरी न करता व्हाइट हाउसमधून निघून गेले.
व्हइट हाऊस सोडल्यानंतर काही मिनिटांतच झेलेन्स्की यांनी एक्स वरील पोस्टमध्ये पाठिंब्याबद्दल अमेरिकेचे आभार मानले. अमेरिकी कॉंग्रेस, अमेरिकेचे अध्यक्ष आणि अमेरिकेच्या जनतेचे आभार आणि धन्यवाद असे नमूद करत युक्रेनला न्याय्य आणि कायमस्वरूपी शांतता हवी आहे आणि आम्ही त्यासाठी काम करत आहोत अशी टिप्पणी त्यांनी केली.





