आता बँक खात्यात ठेवावे लागतील तब्बल ₹50,000; ‘या’ मोठ्या बॅंकेचा खातेदारांना हादरवणारा नवा नियम

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या खातेदारांना आता त्यांच्या बचत खात्यात किमान ५०,००० रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहे. यापेक्षा कमी शिल्लक असल्यास खातेदारांना दंड आकारला जाऊ शकतो. हा नवा नियम १ ऑगस्ट २०२५ नंतर उघडल्या जाणाऱ्या नवीन खात्यांना लागू असणार आहे. बँकेने मेट्रो, शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागातील खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादेत वाढ केली आहे. आता मेट्रो आणि शहरी भागात ५०,००० रुपये, अर्ध-शहरी भागात २५,००० रुपये आणि ग्रामीण भागातील खात्यांसाठी १०,००० रुपये किमान शिल्लक ठेवावी लागणार आहे.
१० वर्षांनंतर किमान शिल्लक मर्यादेत बदल –
यापूर्वी मेट्रो आणि शहरी भागात किमान १०,००० रुपये, अर्ध-शहरी भागात ५,००० रुपये आणि ग्रामीण भागात २,५०० रुपये किमान सरासरी शिल्लक (MAB) ठेवण्याची आवश्यकता होती. २०१५ नंतर प्रथमच आयसीआयसीआय बँकेने किमान शिल्लक मर्यादेत वाढ केली आहे. या वाढीमुळे देशातील खासगी बँकांमध्ये सर्वाधिक किमान शिल्लक मर्यादा आयसीआयसीआय बँकेची झाली आहे.
पाच वर्षांत ११ सरकारी बँकांनी वसूलला ९,००० कोटींचा दंड –
मागील पाच वर्षांत देशातील ११ सरकारी बँकांनी किमान सरासरी शिल्लक ठेवण्यात अपयश आल्याने खातेदारांकडून सुमारे ९,००० कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल केले आहेत. यामुळे बँकांच्या किमान शिल्लक नियमांवर चर्चा पुन्हा तापली आहे.





