पुणे | आता, ५ एवजी १० हजार मिळणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पूरग्रस्तांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला. यापूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रतिकुटुंब कपड्यांच्या नुकसानीकरीता अडीच हजार रुपये आणि घरगुती भांडी यांच्या नुकसानीकरीता अडीच हजार रुपये अशी एक़ूण पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत होती.
आता, शासनाने विशेष बाब म्हणून प्रतिकुटुंब कपड्यांच्या नुकसानीकरीता पाच हजार रुपये तर भांडी वस्तू नुकसानीकरीता पाच हजार रुपये अशी एकूण दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
विशेष म्हणजे पूरग्रस्तांना मदत करण्याकरीता दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरीता घर पाण्यात बुडले असल्याची अट सुध्दा शासनाने शिथिल केली आहे. या अटीमुळे पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात नुकत्याच आलेल्या अतिवृष्टीत दोन्ही शहरातील सुमारे 16 हजार घरांमध्ये पाणी शिरले होते. आता, नागरिकांना या वाढीव आर्थिक मदत मिळणार आहे.
केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग, सततचा पाऊस या आपत्तीमध्ये बाधित होणार्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे.
मदतीचे सुधारीत निकष हे 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. मागील वर्षी राज्यातील कही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना पुरेशी मदत व्हावी, याकरीता मदतीची अट शिथील केली होती.
आता जून ते आॉक्टोंबर 2024 या कालावधीत सुध्दा अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना पुरेशी मदत तातडीने मिळावी याबाबत विशेष दरास एक वर्षाने मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश महसूल विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड यांनी जारी केला आहे.





